Havaman Andaj Today महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यभर मोठं नुकसान झालं होतं. शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून अनेक भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं. दोन दिवस पावसानं उघडीप दिली असली तरी अजूनही राज्यात धोका पूर्णपणे टळलेला नाही. हवामान विभागानं दिलेल्या ताज्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये काही जिल्ह्यांना पुन्हा मुसळधार पावसाचा फटका बसणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच कोकणातील रायगड, मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा
गेल्या काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत अतिवृष्टी झाली होती. आता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात नवा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आहे. याचा प्रभाव राजस्थान आणि पंजाबच्या काही भागांत होणार असून त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावरही दिसणार आहे.
हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार 25 ऑगस्टपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा या भागांमध्ये 25 ते 28 ऑगस्टदरम्यान जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.
पुढील काही दिवस हवामानाचा अंदाज
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार येत्या पाच दिवसांमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर रायगड, सातारा, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसह घाट माथ्यावरील भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
16 ते 21 ऑगस्टदरम्यान राज्यात झालेल्या जोरदार पावसानं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर दोन दिवस पावसाची तीव्रता कमी झाली होती. मात्र, नव्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे.
Disclaimer: या लेखातील माहिती हवामान विभागाकडून जाहीर झालेल्या अंदाजावर आधारित आहे. यामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे अंतिम निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक प्रशासन आणि अधिकृत हवामान विभागाच्या सूचनांचा आधार घ्यावा.